भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघानं पहिल्या २ कसोटी मालिकेतील पराभवासह मालिका आधीच गमावली आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल. याशिवाय कसोटी मालिकेचा शेवट गोड करण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानात उतरेल.
या कारणामुळे रोहितसाठी खास असेल तिसरा अन् मालिकेतील अखेरचा कसोटी सामना
१ नोव्हेंबरपासून रंगणारा हा सामना कर्णधार रोहित शर्मासाठी एकदम खास असेल. कारण हिटमॅन तब्बल ११ वर्षांनी म्हणजे जवळपास दशकानंतर घरच्या मैदानात कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. याआधी २०१३ मध्ये रोहित शर्मानंवेस्ट इंडिज विरुद्ध वानखेडेच्या मैदानात शेवटची कसोटी खेळली होती. या सामन्यात त्याने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतकही झळकावले होते. बऱ्याच दिवसांपासून रोहितच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. घरच्या मैदानातील खास क्षण अधिक अविस्मरणीय करण्याची त्याला संधी असेल.
दशकभरापूर्वी वानखेडेच्या मैदानात उतरला तेव्हा साजरी केली होती सेंच्युरी
२०१३ मध्ये वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मानं १११ धावांची खेळी केली होती. ज्यात ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. हा सामना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील शेवटचा सामना होता. भारतीय संघाने १२६ धावांनी विजय मिळवत क्रिकेटच्या देवाला अगदी थाटात निरोप दिला होता.
रोहित शर्माची कसोटी कारकिर्द
३७ वर्षीय रोहित शर्मानं आतापर्यंत ६३ कसोटी सामने खेळले आहेत. १०९ डावात त्याने ४२.८ च्या सरासरीसह त्याने४२४१ धावा ठोकल्या आहेत. यात १२ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. २१२ ही रोहित शर्माची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहितनं १०३ धावांसह अखेरचं कसोटी शतक साजरे केले होते. त्यानंतर त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. घरच्या मैदानात तो ही उणीव भरून काढत खास सामना अविस्मरणीय ठरवणार का? ते पाहण्याजोगे असेल.