न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरू कसोटी सामन्यात अगदी दिमाखात बॅटिंग करणारा रिषभ पंत पुन्हा एकदा ‘नर्व्हस नाईंटी’चा शिकार ठरला. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याचे शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. कसोटी कारकिर्दीतील सातव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो बाद झाला. कमालीचा योगायोग हा की, ७ व्यांदा त्याच्यावर नव्वदीच्या घरात पोहचून निराश होण्याची वेळ आली. भारतीय संघाच्या डावातील ८९ व्या षटकात पंत बाद झाला. विल ओ’रुर्के एका शॉर्ट ऑफ लेन्थ चेंडूवर तो फसला. बॅटची कड घेऊन चेंडू लेग स्टंपवर आदळला आणि पंतवर तंबूत परतण्याची वेळ आली.
कसोटीत सर्वाधिक वेळा नव्वदीच्या घरात बाद होणारा तिसरा खेळाडू
नव्वदीच्या घरात सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वात अव्वलस्थानी आहे. सचिन तेंडुलकर आपल्या कसोटी कारकिर्दीत १० वेळा नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला होता. भारताचा माजी क्रिकेटर आणि कोच राहुल द्रविड कसोटीत ९ वेळा नव्वदीच्या घरात बाद झाला होता. सुनील गावसकर, एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग हे दिग्गज स्टार ५ वेळा नर्व्हस नाईंटीचे शिकार झाले आहेत. पंत आपल्या अल्प कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत सात वेळा नव्वदीच्या घरात बाद झाला आहे.
कसोटीत ९९ धावांवर बाद होणारा चौथा विकेट किपर बॅटर ठरला पंत
- ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) विरुद्ध श्रीलंका, नेपियर, २००५
- एमएस धोनी (भारत) विरुद्ध इंग्लंड, नागपूर, २०१२
- जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड, २०१७
- ऋषभ पंत (भारत) विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, २०२४
शतक हुकलं; पण तरीही त्याची ही खेळी अविस्मरणीयच, कारण…
𝗢𝘂𝘁 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗸! 😍
Rishabh Pant smacks a 1⃣0⃣7⃣m MAXIMUM! 💥
Live – https://t.co/FS97Llv5uq#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBankpic.twitter.com/4UHngQLh47
— BCCI (@BCCI) October 19, 2024
न्यूझीलंडच्या पहिल्या डावात रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता. जड्डूच्या गोलंदाजीवर चेंडू गुडघ्यावर लागल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. पण यातून सावरत त्याने चौथ्या दिवशी मैदानात उतरत दमदार खेळ दाखवला. १०५ चेंडूंचा सामना करताना त्याने ९ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ९९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी. त्याचे शतक हुकले असले तरी त्याची ही खेळी शतकापेक्षा भारी होती यात शंका नाही. कारण चौथ्या दिवसाच्या खेळात त्याने सर्फराज खानच्या साथीन चौथ्या विकेटासाठी १७७ धावांची दमदार भागीदारी केली.