shikhar dhawan funny video : टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अलीकडेच लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारताचा गब्बर दिसला होता. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी गब्बर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. तो नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. ट्रेंड फॉलो करणाऱ्या धवनने आता एक भन्नाट रील बनवली. पंखेवाला बाबा अर्थात लड्डू मुत्या स्वामींच्या शैलीत त्याने विनोदी व्हिडीओ बनवला. चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देत गब्बरसह त्याच्या सहकाऱ्यांची फिरकी घेतली.
कोण आहे लड्डू मुत्या स्वामी
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या स्वामी हे त्यांच्या भागात प्रसिद्ध होते मात्र एका व्हिडीओने ते देशभरात चर्चेत आले. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली आहे. लड्डू मुत्या स्वामी नावाचे हे बाबा प्रवचनकार आहेत. लोकांनी समाजात चांगले काम केले पाहिजे यामुळे आपले जीवन सार्थक होते. जर प्रत्येकजण आनंदी राहिला तर आयुष्य सुंदर होईल. आयुष्यात कुठल्याही कठीण प्रसंगाला आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे असे ते भक्तांना त्यांच्या प्रवचनातून सांगत असतात. लड्डू मुत्या स्वामी नावाचे हे बाबा कर्नाटकातील बागलकोट भागात प्रवचन देण्याचे काम करतात. त्यांच्या प्रवचनाला लोकांची गर्दी जमते. बाबा चालता फॅन आपल्या हाताने थांबवून भक्तांना आशीर्वाद देतात. त्यांच्या या प्रकाराची अनेकांनी नक्कलही केली आहे. लड्डू मुत्या बाबा यांच्या दर्शनासाठी लोकांची रांग लागते. ते चालता फॅन कसे थांबवतात हा चमत्कारिक कारनामा पाहायला भाविक बाबांना भेटतात. बाबांच्या चाहत्याने त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आणि तो देशभरात चर्चेचा विषय बनला.
अलीकडेच गब्बरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. शिखर धवनने आपला पहिला कसोटी सामना १४ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. मोहालीच्या मैदानात डावाची सुरुवात करताना त्याने ८५ चेंडूत शतक झळकावून सर्वांनाच प्रभावित केले. पदार्पणाच्या सामन्यातील या झंझावाती खेळीसह पदार्पणाच्या कसोटीत जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम धवनने आपल्या नावे केला. हा एक विश्विक्रम आजही कायम आहे. मोहाली कसोटीत त्याने १७४ चेंडूत १८७ धावांची खेळी केली होती.