भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शुबमन गिल आणि रिषभ पंत खेळणार का? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ज्याची पुष्टी झाली आहे.
रिषभ पंतचं काय? तो पुण्याच्या मैदानात उतरणार?
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट ( Ryan ten Doeschate) यांनी पुण्याच्या मैदानात रंगणाऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाच्या ताफ्यातील दुखापतग्रस्त खेळाडूंच्या फिटनेससंदर्भात मोठी अपडेट्स दिलीये, रिषभ पंत पुढच्या सामन्यासाठी तंदुरुस्त असल्याचे सांगत त्यांनी दुसऱ्या कसोटीत तोच विकेट किपरच्या रुपात दिसेल, अशी हिंट दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात गुडघ्याला चेंडू लागल्यानंतर त्याच्या जागी जुरेल ध्रुव विकेटमागे दिसला होता. त्यामुळे पुणे कसोटी सामन्यात तोच विकेट किपरच्या रुपात प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार का? अशी चर्चा रंगली होती. पण सहाय्यक कोच यांनी रिषभ पंत फिट असल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
शुबमन गिलच्या फिटनेसबद्दलची सहाय्यक प्रशिक्षकांनी दिली महत्त्वाची माहिती
पंतशिवाय नॅदरलँडच्या माजी अष्टपैलू खेळाडूने शुबमन गिलच्या फिटनेसची पुष्टी केली आहे. पुण्याच्या मैदानातून शुबमन गिलही कमबॅक करेल, असे ते म्हणाले आहेत. मानेच्या दुखापतीमुळे तो बंगळुरु कसोटी सामन्याला मुकला होता. तिसऱ्या क्रमांकावर त्याच्या जागी विराट कोहलीनं फलंदाजी केली होती. पुन्हा तो आपल्या स्थानावर फलंदाजी करताना दिसेल, असे सहाय्यक प्रशिक्षकांनी स्पष्ट केले आहे.
सर्फराज की, KL राहुल? दोघांपैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाचा लागणार नंबर?
पुण्याचं मैदान मारून भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. या परिस्थितीत भारतीय संघ सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल, असेही भारतीय सहाय्यक प्रशिक्षकांनी म्हटले आहे. शुबमन गिलची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाल्यानंतर लोकेश राहुलचा पत्ता कट होणार, याची संकेत त्यांनी दिले. शुबमन गिलच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेल्या सर्फराज खान याने १५० धावांची खेळी करत आपले प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्के केले आहे. त्यामुळेच लोकेश राहुलसंदर्भात कठोर निर्णय घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय संघ व्यवस्थापनाकडे नसेल.