भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात वर्णी लागलेल्या हर्षित राणाला मुंबई कसोटी सामन्यासाठी संघात सामील करण्यात आले आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ देशांतर्गत क्रिकेटमधील आणखी एका मोहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. याआधी पुण्याच्या मैदानात रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला अचानक संघात स्थान देण्यात आले होते. एवढेच नाही तर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला आणि छापही सोडली.
रणजी सामन्यात बॅटिंग बॉलिंग दोन्हीत चमकला
न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत हर्षित राणा राखीव खेळाडूंच्या रुपात टीम इंडियात होता. पण त्याला रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यासाठी रिलीज करण्यात आले होते. रणजी स्पर्धेतील सामन्यात दिल्लीकडून खेळताना आसाम विरुद्धच्या लढतीत हर्षित राणानं पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात २ विकेट्सह एकूण ७ बळी मिळवले. याशिवाय पहिल्या डावात त्याने ५९ धावांची खेळीही केली. आसाम विरुद्धचा हा सामना दिल्लीच्या संघाने १० विकेट्स राखून जिंकला.
मुंबईच्या मैदानात पदार्पणाची संधी मिळणार ?
हर्षित राणाला बॅकअपच्या रुपात संघात सामील करण्यात आले आहे, की प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणार? हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण २२ वर्षीय गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मुंबईत मिळू शकते, असे चित्र सध्यादिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी त्याला घरच्या मैदानात आजमावण्याची चाल उत्तम ठरू शकते.
जर तो मुंबईच्या मैदानात उतरला तर…
माजी नॅशनल सिलेक्टर आणि दिल्लीचे विद्यमान प्रशिक्षक सरनदीप सिंह इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलखतीमध्ये म्हणाले की, “हर्षित कसोटी खेळण्यासाठी तयार आहे. जर ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी त्याला मुंबई कसोटीत संधी मिळाली तर युवा गोलंदाजासाठी ती एक जमेची बाजू ठरेल.” हर्षित राणा हा जवळपास वर्षभर रेड बॉल क्रिकेटपासून दूर होता. दुलीप करंडक स्पर्धेतून त्याने दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले होते. दोन सामन्यात त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या.
टीम मॅनेजमेंटचं ऐकलं, आनंदी आनंद…!
हर्षित राणा हा बांगलादेश विरुद्धच्या टी २० मालिकेत टीम इंडियाचा भाग होता. पण त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. आसाम विरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर हर्षित म्हणाला की, ” ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे, अशी टीम मॅनेमेंटला वाटत होते. या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याचा आनंद आहे.”