न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता मुंबई कसोटी सामन्याआधी जसप्रीत बुमराहला मोठा फटका बसला आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहनं गोलंदाजीतील आपलं नबर वन स्थान गमावलं आहे.
टेस्टचा नवा किंग कोण?
दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडा याने भारतीय संघाच्या ताफ्यातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा नंबर वनचा ताज हिसकावला आहे. आता तो कसोटीमधील गोलंदाजांच्या यादीतील नवा किंग झालाय. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ९ विकेट्स घेतल्या होत्या. संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत त्याने कसोटी क्रमवारीत आपला दबदबा निर्माण केला आहे. रबाडा याआधी २०१८ मध्ये पहिल्यांदा अव्वलस्थानावर पोहचला होता.
भारताचा आर अश्विनही टॉपमध्ये
पुण्याच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात बुमराहला एकही विकेट मिळाली नव्हती. त्यामुळे कसोटी क्रमवारीतील त्याने नंबर वनचा ताज गमावला. त्याच्या क्रमवारीत दोन स्थानांनी घसरण झाली. ऑस्ट्रेलियन जोश हेजलवुड कसोटीतील गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून त्यापाठोपाठ बुमराह आणि चौथ्या क्रमांकावर आर अश्विनचा नंबर लागतो. आर अश्विन याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. तरी त्याला क्रमवारीत फटका बसल्याचे पाहायला मिळते.
कोहली-पंत कसोटी क्रमवारीतील टॉप १० मधून ‘आउट’
गोलंदाजीतील क्रमवारीशिवाय फलंदाजीतही टीम इंडियातील खेळाडूंना फटका बसला आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कहोलीसह रिषभ पंत टॉप १० मधून बाहेर पडले आहेत. रिषभ पंत ५ व्या क्रमांकावरुन थेट ११ व्या क्रमांकावर पोहचलाय. दुसरीकडे विराट कोहली १४ व्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत इंग्लंडचा जो रुट अव्वलस्थानावर कायम असल्याचे दिसून येते. याशिवाय भारतीय संघाविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडच्या स्टार बॅटर रचिन रवींद्र याने ८ स्थानांनी सुधारणा करत १० स्थानावर कब्जा केला आहे.