IND vs NZ 3rd Test in Mumbai, Wankhede Stadium: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिले दोन सामने जिंकून किवी संघाने मालिका २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने भारतात कसोटी मालिका जिंकली असली तरी शेवटचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला आपली लाज वाचवायची आहे. हे शक्य होऊ शकते, कारण भारतीय संघाचा वानखेडेवरील कसोटी रेकॉर्ड खूपच उत्कृष्ट राहिला आहे.
गेल्या वेळी वानखेडेवरच केला होता न्यूझीलंडचा पराभव
गेल्या १२ वर्षांत भारतीय संघ या मैदानावर एकही कसोटी सामना हरलेला नाही. या मैदानावर शेवटची कसोटी डिसेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध होती. भारताने हा सामना ३७२ धावांच्या फरकाने जिंकला. भारतीय संघाला नोव्हेंबर २०१२ मध्ये वानखेडेवर शेवटचा पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. यानंतर भारतीय संघाने या मैदानावर तीन कसोटी खेळल्या आणि तिन्ही जिंकल्या. या काळात अनुक्रमे वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव झाला.
- वानखेडेवर भारतीय संघाचा कसोटी इतिहास
सामने: २६ | विजय: १२ | पराजय: ७ | अनिर्णित: ७
- वानखेडेवर न्यूझीलंड संघाचा कसोटी इतिहास
सामने: ३ | विजय: १ | पराभूत: २
विल्यमसन खेळणार नाही
तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन तिसऱ्या कसोटीसाठी मुंबईत येणार नाही. म्हणजेच विल्यमसन तिसऱ्या कसोटीतून बाहेर असेल. पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी विल्यमसन न्यूझीलंडमध्येच राहणार आहे. आता तो थेट इंग्लंडविरुद्ध २८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.