न्यूझीलंडच्या संघाने दुसरा कसोटी सामना जिंकत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी खिशात घातलीये. पुण्याच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने तिसऱ्या दिवशीच ११३ धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. याआधी बंगळुरु कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं ८ विकेट्सनी विजय मिळवला होता.
१२ वर्षांनी टीम इंडियावर आली ही वेळ, गंभीरचं नशीब निघालं फुटकं
गौतम गंभीर याने प्रशिक्षक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर टीम इंडियाची ही दुसरी कसोटी मालिका होती. या कसोटी मालिकेत जवळपास १२ वर्षांनी टीम इंडियावर मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. यासह गौतम गंभीरसोबत कमालीचा योगायोग जुळून आला. हा योग गंभीरचं नशीबच निघालं फुटकं, असा सीन निर्माण करणारा आहे.
आधीच्या पराभवाचा फटका अन् गंभीरसह विराट अन् आर अश्विन कनेक्शन
याआधी भारतीय संघाने २०१२-१३ मध्ये मायदेशात कसोटी मालिका गमावली होती. योगायोग हा की, त्यावेळीही गौतम गंभीर हा टीम इंडियाचा भाग होता. फरक फक्त एवढाच की, आज तो टीम इंडियाचा कोच आहे अन् त्यावेळी तो खेळाडूच्या रुपात संघात दिसला होता. १२ वर्षांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची ४ सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने गमावली होती. गौतम गंभीरशिवाय विराट कोहली आणि आर अश्विनही मालिका गमावणाऱ्या टीम इंडियाचा भाग होते.
२४ वर्षांत भारतीय संघाने घरच्या मैदानात गमावली चौथी कसोटी मालिका
२००० मध्ये हॅन्स्री क्रोनिएच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला घरच्या मैदानात रंगलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी मात दिली होती. त्यानंतर २००४ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून टीम इंडियावर २-१ अशा पराभवाची नामुष्की ओढावली होती. या मालिकेत काही सामन्यात रिकी पाँटिंग तर काही सामन्यात एडम गिलख्रिस्ट कांगारू संघाच्या कॅप्टन्सीची धूरा सांभाळताना दिसून आले होते. २०१२मध्ये अॅलेस्टर कुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने टीम इंडियाला २-१ अशी मात दिल्यानंतर १२ वर्षांनी टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघासमोर टीम इंडियावर घरच्या मैदानात मालिका गमावण्याची नामुष्की आली.