IND vs NZ 2nd Test | पुणे : न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने पराभवाची जबाबदारी स्वीकारली. एक संघ म्हणून आम्ही कमी पडलो असल्याचे रोहितने आवर्जुन सांगितले. सलग दुसऱ्या पराभवामुळे टीम इंडियाने मालिका गमावली. पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाला इतिहासात प्रथमत भारतात कसोटी मालिका जिंकण्यात यश आले. भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने टीम इंडियावर ही नामुष्की ओढावली. विशेष बाब म्हणजे भारतीय संघ तब्बल ४,३३१ दिवसांनंतर आपल्या मायदेशात कसोटी मालिकेत विजय मिळवण्यात अपयशी ठरला.
आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी मागील १२ वर्षांत खूप चांगली कामगिरी केली. त्यामुळे एखाद्या सामन्यात त्यांच्याकडून काही खास न झाले तरी त्याचा स्वीकार करायला हवा. ते प्रत्येकवेळी फलंदाजीत चमक दाखवू शकत नाहीत. आम्ही कसोटी आणि मालिका हरलो याने मी दुखावलो आहे. पहिल्या डावात साजेशी फलंदाजी न केल्याने पराभवाचा सामना करावा लागला असे सांगताना आम्ही एक संघ म्हणून अपयशी ठरलो असून कोणता फलंदाज किंवा गोलंदाज दोषी नाही हा संघाचा पराभव आहे, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले.
न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना बलाढ्य भारताला प्रथमच त्यांच्या घरात हरवले. पुणे कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला आणि पाहुण्या किवी संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बंगळुरू आणि पुणे कसोटीतील पराभवासह भारत मोठ्या कालावधीनंतर मालिका जिंकण्यात अपयशी ठरला. मागील तब्बल २९५ महिन्यांमध्ये केवळ तीन संघांना भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकता आली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया (२००४) आणि इंग्लंडने (२०१२) ही किमया साधली होती. आता या यादीत न्यूझीलंडच्या (२०२४) संघाचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडच्या संघाने ६९ वर्षांनंतर टीम इंडियाला भारतात कसोटी मालिकेत पराभूत केले. न्यूझीलंडच्या क्रिकेटसाठी हा सोनेरी क्षण असून, दारुण पराभवामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या सेनेला लक्ष्य केले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर किवी संघाने जोरदार पुनरागमन केले आणि अव्वल स्थानी असलेल्या भारताला पराभवाची धूळ चारली.